...एक प्रवास जो मला खूप काही शिकवून गेला...

माझ्या सध्याच्या ऐपती प्रमाणे मी रेल्वेचं सेकंड सीटरचं बुकिंग केलेलं होतं. सकाळी 6 वाजता माझा रेल्वेचा प्रवास सुरु झाला. बुकिंग असल्यामुळे मी निवांत होतो. प्रवास सुरु झाल्यानंतर मी जवळपास तासभर माझ्या आयुष्यातल्या अडचणींची उजळणी करत होतो तेंव्हा मला जाणीव झाली कि महिन्याच्या महिन्याला बरोबर ठराविक तारखेला पैसे भेटून, राहायला चांगल घर असून आणि दोन वेळच्या खाण्याची भ्रांत नसताना पण किती असमाधान आहे माझ्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्याशी निगडित असलेल्या व्यक्तींना. आणि मग माझं विचारचक्र सुरु झालं. आपण या समाजाचं काहीतरी देण लागतो या विचारातून जो मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पीएचडी करण्याचा निर्णय घेतला आणि यात मी जे काम करतोय त्यात मला खूप समाधान भेटलं. भरून पावल्यासारखं वाटायला लागलं आणि असं वाटायला लागलं की आपण करत असलेल्या आणि भविष्यात करणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील कामामुळे मी माझ्या समाजाला काही तरी देऊ शकेल. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातल्या कमकुवत वर्गाला ताकदवान बनवेल आणि त्यांचा चांगलं शिक्षण घेण्याचा हक्क माझ्या परीने त्यांना मिळवून देण्यास मदत करेल. पण समाधानी राहील तो माणूस कसला. प्रत्येक गोष्टीमध्ये मला आणि माझ्या आयुष्याशी निगडित बऱ्याच व्यक्तींना काही ना काही अडचण वाटायला लागली. पैसा, राहणीमान, वेळ, अपेक्षा, नातं आणि अजून कैक गोष्टी आहेत. विनाकारण या गोष्टींना स्वतःसाठी किंवा दुसऱ्यामूळे अतिमहत्व देऊन आपण आपलं आयुष्य खूप क्लिष्ट करून घेतल्याचं मला जाणवलं.

या विचारात असताना एकदमच माझी नजर अंगावर फाटलेले कपडे असलेल्या आणि दरवाज्यात उभं राहून कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघणाऱ्या एका आजी आजोबांकडे गेली. त्यांना दरवाज्यात असं उभं राहिलेलं पाहून खाडकन माझे डोळे उघडले. मग माझी नजर सैरभैर इकडे तिकडे फिरू लागली. मला लगेच रेल्वे मध्ये जे फेरीवाले येतात; कोणी खेळणी विकणारा, कोणी पुस्तकं विकणारा, आंधळा असून सुद्धा आयुष्याची कसरत करत संसारासाठी दोन पैसे कामावणारा, सगळे दिसायला लागले. त्यांचा दोन वेळच्या खाण्यासाठीचा संघर्ष दिसायला लागला. इतक्यात एक स्टेशन आलं आणि तिथे भर उन्हात बसलेल्या खूप वयस्कर आजी काकडी विकताना दिसल्या. त्यांच्यासोबतच्या फक्त 6-7 वर्षांच्या मुलाची त्या काकड्या विकण्यासाठीची इकडे तिकडे पळण्याची कसरत पहिली. नकळतच टचकन डोळ्यातून अश्रू आले आणि मला समजेनासं झालं कि हे काय होतंय. त्यांचं सगळ्यांचं आयुष्यातलं झगडनं बघून हे मला काय होतंय. हे सगळं याआधी पण मला दिसायचं, त्यांच्यासाठी काहीतरी करावं वाटायचं आणि वाईट पण वाटायचं पण आजचा मी वेगळा होतो. माझा त्रास, अडचणी, संघर्ष त्यांच्यापुढे काहीच नव्हतं...

मग मला कळालं की हे सर्व का होतंय...
लहानपणापासून आई वडिलांनि त्यांची कातडी झिजवून सगळं दिलं.. कशाची कमी नाही पडू दिली. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं...माझ्या वडिलांचे कष्ट, माझ्या आईने नेहमीच त्यांना दिलेली साथ...पार कंबरड मोडे पर्यंतचे त्यांचे अफाट कष्ट...
पण हे सर्व फक्त बघितलं होतं, कधी अनुभवलं नव्हतं...आता जेंव्हा याच सर्व दिव्यातून जातोय आणि अनुभव घेतोय..तेंव्हा खरी जाणीव होतेय या गोष्टींची..
मला लहानपणापासूनच कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही आणि मुद्दामहुन आई वडिलांनी सहजासहजी दिली पण नाही..त्यांनी याची काळजी घेतली की प्रत्येक गोष्टीची किंमत कळली पाहिजे..त्यामागचे कष्ट कळले पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे..आणि त्यांच्या ह्याच संस्कारांनी मला माणूस बनवलं..
पण जेव्हा मी समाजाकडे बघतो तेव्हा एका गोष्टीची कटाक्षाने जाणीव होते..बरेच पालक हे करत नाहित..मुलांच्या प्रेमापोटी आणि त्यांचे लाड पुरवण्याच्या नादात मुलांना जे पाहिजे जसं पाहिजे तसं देतात आणि त्यामुळे ते मिळावण्यासाठीचा संघर्ष काय असतो हे त्यांना कळतच नाही..आपण समाजाचा एक भाग आहोत आणि आपण त्याचं काही देनं लागतो हे त्यांच्यात रुजल्याच जात नाही..आणि मग समाज, परोपकार आणि आपण समाजाचं काही देणं लागतो मुळात हि भावनाच त्यांच्यात नसते..त्यांना फक्त प्रत्येक गोष्ट हवी असते, त्यामागचं कष्ट याची जाणीवच राहत नाही, मग ते पैसा अडका, कपडे लत्ते असो किंवा सोनं नाणं असो...हे सर्व मिळवताना त्यांना दिसतात त्या फक्त स्वतःच्या अडचणी..आणि या हव्यासापोटी त्यात एवढे गुरफटून जातात कि त्यातून बाहेर पडायला आणि समाजासाठी काही करायला त्यांना वेळच मिळत नाही.

मी माझ्या आई वडिलांचा सदैव ऋणी राहील कि त्यांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आणि मला एक चांगला माणूस बनवलं. पैसाच सर्व काही नसतो हि शिकवण दिली. जेंव्हा माणसाला हे कळतं तेंव्हाच तो समाज, परोपकार या गोष्टी आणि माणूस म्हणून त्याच कर्तव्य समजू शकतो.

Comments